*महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे प्रदीप गायके, मनोज महाले यांचा भाजपात पक्ष प्रवेश.*

महाविकास आघाडीची धुरा सांभाळणारे प्रदीप गायके, मनोज महाले यांचा भाजपात पक्ष प्रवेश.
पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर (प्रतिनिधी):- काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार, छत्रपती संभाजी ब्रिगेड या राजकीय संघटनांची धुरा आपल्या कलागुणांनी यशस्वी सांभाळणारे धुरंधर आणि प्रत्येक विषयात भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे चतुर राजकारणी आणि पत्रकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव ,अभ्यासक प्रदीप गायके आणि मनोज महाले या जोडीने दी.७ रोजी ना. गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी ना.महाजन यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
गेल्या दशक भरात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप विरोधात विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे काम या दोघांशिवाय पूर्णच झाले नाही. हा आज पर्यंतचा इतिहास जामनेर शहरासह तालुक्याने बघितला आहे. मग आत्ताच काय झाले की, यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला. या अगोदर ज्यांनी भाजप मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यावर टीका टिप्पणी यांनीच केली होती . आता हेच भाजप मध्ये दाखल झाले असून महाविकास आघाडीमध्ये यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली असून आधीच महाविकास आघाडी तालुक्यात खिळखिळी झाली आहे .पुढे होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यातल्या त्यात जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधली जाणार का? हा प्रश्न महाविकास आघाडीच्या मतदारांपुढे पडला आहे. तसे ही पाहिले तरी जामनेर नगर परिषद ही या अगोदरही २५/० च्या फरकाने भाजपच्याच ताब्यात होती. आणि आता सुद्धा २७/० होणार असल्याची स्थिती भाजपची असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी फरक भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांना ही नसावा असे चित्र शहरासह तालुक्यात दिसून येत आहे. विरोधी बाकावर बसायलाही कोणी तयार नसून प्रवाहाच्या दिशेने जाणाऱ्यांचा कल वाढत चालला असून उलट्या प्रवाहात वाहून जाण्याची भीती वाटत असल्यामुळेच भाजप मध्ये जाणाऱ्यांचा कल वाढत चालला आहे. येणाऱ्या २ डिसेंबर ला नगर परिषदेची निवडणूक असून महाविकास आघाडीमध्ये अजूनही हालचाली दिसून येत नाही. तुसरीकडे भाजप मध्ये मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होतांना दिसून येत आहे. या निवडणुकीत भाजप मध्ये जुन्या नव्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू असून यांच्यात समेट घडविण्याचे काम ना. महाजन यांनाच करावे लागणार आहे. भाजप मध्ये मात्र ना. महाजन यांचा शब्द प्रमाण मानला जातो. ते सांगतील तोच उमेदवार फायनल होत असतो.त्यामुळे इच्छुकांना थोपवण्याचे व होणारी बंडखोरी रोखण्याचे काम ते सहज करू शकतात यात दुमत नाही. पक्ष प्रवेश सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, ज्येष्ठ नेते जे. के. चव्हाण, जामनेर शहर मंडल अध्यक्ष रविंद्र झाल्टे, जिल्हा सरचिटणीस आतिष झाल्टे, तसेच जितेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours