पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
कही खुशी कही गम!
जामनेर :- गेल्या महिनाभरापासून तालुक्यात वरुण राजाने विश्रांती घेतली होती. जून महिन्यात पेरणी पूरक पाऊस झाल्याने बळीराजाने आकाशाला भिडणारे, महागडे बियाणे धरणी माईच्या कुशीत टाकून निसर्गाच्या भरोशावर जो नेहमीच खेळला जातो असा सट्टा खेळला होता. पिकांची उगवण क्षमता त्यावेळेस पाऊस बऱ्यापैकी झाल्याने उत्तम झाली होती.आपल्या हाती चांगले उत्पन्न येईल या भाबड्या आशेवर बळी राजा स्वप्न रंगऊ लागला होता. परंतू नेहमी प्रमाणेच निसर्ग राजाने वेळेवर दगा दिला. जी पिके बळीराजाचे खिसे भरणार होती. ती पाऊसाने दडी मारल्याने कोमजु लागली होती. नेमके या वर्षी बळीराजाने नगदी पीक म्हणून ज्याची गणना केली जाते असे कापसाच्या पीकाची लागवड कमी करून (भावाच्या अभावी) मका पिकाची लागवड जास्त प्रमाणात केल्याने त्याच मका पिकाला पाऊसाने उघडीप दिल्याने जास्त फटका बसला असल्याचे दिसून येत आहे.मका ह्या पिकाला जास्त पाणी लागत असल्याने पिके जास्त प्रमाणात जळत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत होते. गेल्या महिन्या भरापासून पाऊस येत नसल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या या परिस्थितीत बळीराजा हवालदील झालेला दिसून आला.मात्र उशिराका होईना गेल्या २ दिवसांपासून तालुक्यावर वरून राजाची कृपादृष्टी झाली.तालुक्यातील काही भागात जोरदार तर भागात पिकांना जीवदान देणारा पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात उत्पन्न आपल्या पदरात पडेल या आशेवर शेतकरी राजाने आपल्या पुढील कामकाजाला सुरुवात केली असून झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी पिकांमध्ये निघून जाईल असे स्वतःलाच समजावत बळीराजा समाधानी असल्याचे भासवतांना दिसून येत होता.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे पेरणी नंतर पहिल्यांदाच नदी, नाले ओसंडून वाहतांना दिसून येत असून काही ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे.


त्यात तालुक्यातील रोटवद, नांद्रा, नाचणखेडा, देवपिंपरी, पाळधी, पिंपळगाव (कमानी),सुनसगाव या गावांमध्ये व्यापाऱ्यांचे व काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असून तलाठी वर्गाला ज्या भागात नुकसान झाले असेल त्या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसाणीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून शासनाकडून लवकरच नुकसान भरपाई मिळेल अशी आशा बाळगण्यास हरकत नसावी असे तालुक्यातील जानकर व्यक्ती उपासात्मक बोलतांना दिसून येत आहेत. तालुक्यातील लहान मोठ्या नदी, नाल्यांना पूर आल्याने लघु प्रकल्प व छोटे मोठे धरणे भरल्या जात असून याचा फायदा पुढील रब्बी हंगामासाठी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच होईल यात दुमत नाही. मात्र ज्या ठिकाणी अती पावसामुळे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तालुक्यातून करण्यात येत आहे. या पावसामुळे येवढेच म्हणता येईल.
“कही खुशी कही गम ‘.

+ There are no comments
Add yours