जळगांव – सद्यस्थितीत जळगाव शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याबाबत अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये अनावश्यक भीती व गोंधळ निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
याबाबत जिल्हा प्रशासन स्पष्ट करते की, जळगाव शहर तसेच जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची पेट्रोल/डिझेल टंचाई निर्माण झालेली नाही. पेट्रोल/डिझेल इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे व संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी खालील बाबींची विशेष दक्षता घ्यावी :
१. कोणत्याही अप्रमाणित अफवा, सोशल मीडियावरील चुकीचा संदेश किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.
२. नाहक भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये किंवा एकाच वेळी जास्त प्रमाणात पेट्रोल/डिझेल खरेदी करू नये.
३. पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी व वाहतूक कोंडी तसेच कायदा व सुव्यवस्था विषयक परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन व संबंधित कंपन्यांकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, यावर विश्वास ठेवावा.
५. अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय अपराध असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
६. कोणतीही शंका असल्यास अधिकृत शासकीय माध्यमांद्वारेच माहिती घ्यावी.
जिल्हा प्रशासन नागरिकांना शांतता, संयम व सहकार्य राखण्याचे आवाहन करीत आहे. सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, याची खात्री बाळगावी.

+ There are no comments
Add yours