रेल्वे गेट तोडून ट्रकची अमरावती एक्स्प्रेसला धडक.
बोदवड – नाडगाव गेटजवळ घडली घटना, जिवीत हानी नाही.
बोदवड (सुहास बारी):- गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेले रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला असून दोन पॅसेंजर रद्द करण्यात आले आहेत. घटनास्थळी रेल्वे पोलीस व बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत.तसेच रेल्वेचे आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रक क्रमांक टी एन ५२- एफ -७४७२ आज दि. १४ रोजी सकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडून बोदवड कडे गहू घेऊन जात होता. रेल्वे ओव्हर ब्रिज वरून न जाता बंद असलेल्या रेल्वे गेट तोडून ट्रॅकवर आला. त्याचवेळी अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस वेगात असल्याने ट्रकला धडक देऊन २०० ते ३०० मीटर पर्यंत ट्रकला ओढत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत करण्यासाठी पोहचले आहेत.
अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिन खाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन जेसीबी घटनास्थळी बोलवण्यात आले व ट्रक काढण्याचे प्रयत्न सुरू होते. परिसरातील विद्युत पुरवठा ही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस नवजीवन एक्सप्रेस दुरंतो एक्सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात आले. तर भुसावळ बडनेरा व बडनेरा नारखेडा कडे जाणारी पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आलेली आहे. तर काही गाड्या वरणगाव भुसावळ कडे थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी बोदवड पोलीस स्टेशन शी संपर्क साधला असतात त्यांनी सागितले की, अमरावती कडे जाणारी अमरावती एक्सप्रेसला रेल्वे ट्रॅकवर ट्रक येऊन धडकला आहे, या घटनेत कुणालाही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड येणाऱ्या जुना रस्त्याने येत होता, बाजूलाच ओव्हर ब्रिज झाल्यामुळे हा रस्ता बँरीकेड लावून बंद करण्यात आलेला आहे, ट्रक ड्राइवरला जुनाच रस्ता माहित असावा, पूल सुरु होऊन दीड वर्ष होत आलंय दीड वर्षांपूर्वी या रोडने हा ट्रक ड्राइवर गेला असेल म्हणून तो पुलावर न जाता खालच्या रस्त्याने जात असावा. गॅस कटर ने ट्रक कट करायचे काम सुरू झाले आहे, जे सी बी च्या साहाय्याने ट्रक काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की इंजिनचेही नुकसान झालेले आहे. अपघात झालेले इंजिन दुरुस्तीसाठी पियोजकडे पाठवण्यात येणार आहे. तर अमरावती एक्सप्रेसला नवीन इंजिन लावण्यात येऊन गाडी मार्गस्थ करण्यात येणार आहे. रेल्वेचे आपत्कालीन व्यवस्थापण घटनास्थळी थांबून असून रेल्वेचा मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
+ There are no comments
Add yours