पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
दोन बकऱ्या, एक मोटार सायकल, ओमनी कार जळून खाक.
जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील बोदवड रोड भागात असलेल्या सलीम शेख यांच्या गॅरेज मध्ये दी.२९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गॅस हंडीचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. अवैध पद्धतीने एल पी जी गॅस ओमनी कार मध्ये भरत असताना हा भीषण स्फोट झाला असून, या दुर्घटनेत एक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ओमनी कार मधून ८ते १० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळत असून गॅस भरतांना सर्व प्रवासी ओमनी कार मधून खाली उतरून बाजूला थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे प्रवासी वर्गातून सांगण्यात आले मात्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा , पिशव्या ओमनी कार मध्ये ठेवण्यात आल्या होत्या त्यात त्यांचे पैसे व किंमती कपडे लत्ते असल्याचे त्यांनी सांगितले असून ते मात्र जळून खाक झाले असल्याचे प्रवाशांनी सांगितले. त्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
स्फोटात सहा ते आठ हंड्यांचा एका मागोमाग स्फोट झाला असून, एक जण जखमी झाला तर दोन बकऱ्या, ओमनी कार व एक मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली.
सुदैवाने या स्पोटात मनुष्य हानी झाली नाही.मात्र तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवैध पद्धतीने गॅस गाड्यांमध्ये भरला जात असल्याची माहिती समोर येत असून पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्यास मनुष्य हानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेज मध्ये सदर घटना घडली असून एखाद्या वस्तीमध्ये असा प्रकार घडल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो.त्यामुळे अशा अवैध पद्धतीने गॅस भरणाऱ्या रॅकेटचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. घटनेचा पुढील तपास जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अवैध गॅस भरणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

+ There are no comments
Add yours