*जि. प. शाळा शेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

जि. प. शाळा शेरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

 जामनेर (प्रतिनिधी):-  १४ एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती तालुक्यातील शेरी येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद बनकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी मुख्याध्यापक गणेश राऊत, शिक्षक गोपाल पाटील, युवा प्रशिक्षणार्थी सौ. मंगला पाटील यांच्यासह शाळा व अंगणवाडीतील कर्मचारी उपस्थित होते. 

या खास प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रेरणादायी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या शिक्षण, समता, आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणातून बाबासाहेबांनी दिलेला ‘शिका, संघर्ष करा, संघटित व्हा’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.

मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन

मुख्याध्यापक गणेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शाळेचे शिक्षक गोपाल पाटील यांनी डॉ.बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेल्या समता, स्वातंत्र्य, आणि बंधुता या मूल्यांवर मार्गदर्शन केले. सौ. मंगला पाटील यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे सुविचार आत्मसात करून स्वतःच्या जीवनात प्रगती साधण्याचा सल्ला दिला. 

शाळेचा उत्साहपूर्ण सहभाग

कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांना बाबासाहेब यांच्या जीवनावरील चित्रफित दाखवण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद बनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours