पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई मयूर पाटील यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण.
जामनेर(प्रतिनिधी):- शहरातील वाकी खुर्द येथील जिनियस इंटरनॅशनल स्कूल मध्ये १५ ऑगस्ट भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मयूर डी. पाटील, सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि डॉ.सौ. स्नेहलताई एम. पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वराज्य प्रतिष्ठान संचलित जिनियस इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष भीमराव पाटील, कोषाध्यक्ष अशोक सोनवणे, संचालक सदस्य – पंढरी पाटील, डॉ.नंदलाल पाटील आणि सौ. शिल्पाताई नितीन पाटील यांच्यासह पालक प्रतिनिधी अमृत पाटील, व्यवस्थापन प्रतिनिधी सौ.जयश्रीताई अशोक पाटील आणि सौ. प्रज्ञाताई उदय पाटील यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
या उत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या मार्चिंग परेडने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन, झेंडा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनानंतर शाळेचे शिक्षक दीपक धनगर यांनी उपस्थित सर्वांना तंबाखूमुक्त भारताची शपथ दिली.प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संगीत शिक्षक संतोष शिराळे व त्यांच्या समूहाने अत्यंत सुरेल स्वागत गीत सादर केले. या संस्मरणीय प्रसंगी, कु. मधुश्री कैलास गायकवाड आणि कु. स्वराली सुरेश पाटील यांनी अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रेरणादायी भाषणे दिली. शाळेचे शिक्षक अमोल डागवाले आणि त्यांच्या टीमने ‘वंदे मातरम’ या ए आर रहमान यांच्या सुरेल देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. ज्याने प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

फुटबॉल, कॅरम आणि तायक्वांदोमध्ये तहसील, जिल्हा आणि राज्य पातळीवर उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शाळेच्या मुलींचा फुटबॉल संघ, चि. सोहेल शेख, कु. श्रुती पवार आणि चि. साहिल सागर यांचा समावेश होता. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी जन्मलेल्या विद्यार्थ्यांना मंचावर बोलावून व शुभेच्छा गीत गाऊन सर्व उपस्थितांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या विविध स्पर्धांची यावेळी मान्यवरांना माहिती देण्यात आली.विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे निकाल देखील यावेळी जाहीर करण्यात आले, तसेच हेड बॉय आणि हेड गर्ल आणि विद्यार्थी परिषदेतील सर्व निर्वाचित सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना संबोधित करतांना जर आपण स्वतःला बदलले तर संपूर्ण देश बदलेल. तुमच्या सवयी बदला, देश बदलेल; भारतीय म्हणून प्रगती करा त्यातून भारत प्रगती करेल.अशा साध्या व समर्पक शब्दांमध्ये माननीय मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रभावी संदेश दिला.अध्यक्षीय भाषण. पंढरी दादा पाटील यांनी केले, त्यानंतर उमेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली सोनार यांनी केले.संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, मा.प्राचार्य डॉ. दीपक गोसावी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला, सर्व कॉर्डिनेटर व इन्चार्ज यांचे मार्गदर्शन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान, पालक आणि विद्यार्थ्यांनी दिलेले सहकार्य या सर्वांमुळे कार्यक्रम परिपूर्ण झाला. ‘वंदे मातरम्’ च्या देशभक्तीपर स्वरांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.


+ There are no comments
Add yours