पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
थकलाय बाप पण हरलेला नाही.
काळजी करू नकोस अजून मी जिवंत आहे. ही वाक्य मनात घर करून जातात.
जामनेर – जामनेरच्या बसस्टँड वर बसलेला एक बाप, घामाने ओला झालेला शर्ट, धुळीने माखलेली चप्पल, आणि चेहऱ्यावर शांत पण थकवलेली नजर.
शेजारी माणसं मोबाईलवर गेम खेळत होती, काही झोपलेले, काही गाणी ऐकत होते… आणि हा बाप?
त्याच्या डोळ्यांपुढे चालू होती “घराचा हप्ता भरण्याची तारीख, मुलाच्या मोबाईल चा हप्ता, घरचा किराणा, आणि अजूनही न भरलेले वीजबिलं.”
गर्दीने भरलेली बस त्याच्यासाठी आयुष्याची ट्रेन होती.दररोज त्या बसमध्ये तो आपले स्वप्न घेऊन प्रवास करायचा मुलाचं यश, घराचं सुख, आणि बायकोच्या चेहऱ्यावरचं समाधान.
बांधकामावर दिवसाकाठी आठ तास कडक ऊन्हात काम करूनही, त्याच्या तोंडावर कधी थकवा नव्हता.
शेवटी जेव्हा कुणी विचारायचं,
“कधी थांबणार?”तेव्हा तो शांतपणे म्हणायचा
“माझ्या लेकराचं भविष्य तयार व्हायचंय… अजून थांबायचं नाही.”
त्याचा मुलगा शिकतोय कॉलेजात, अभ्यासात रमलेला.
त्याला माहित नाही, की त्याच्या एका शर्टामागे किती दिवस उपाशीपोटी रात्री झोपलेला बाप आहे.
त्याला वाटतं, घर चालतंय पण खरं तर, बाप चालतोय म्हणून घर चालतंय.
एके दिवशी बसमध्ये बसताना त्याचा थकवा अचानक डोळ्यांतून ओघळला. कोणालाच कळलं नाही.
पण त्याच्या खिशात एक फोटो होता मुलाचा हसरा चेहरा.
त्याने तो फोटो पाहिला आणि ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा उमटली.
तो पुटपुटला”थकलोय पण अजून हरलो नाही. कारण माझं स्वप्न अजून जिवंत आहे.”आज जग धावतेय कारण अजूनही असे थकलेले बाप थांबलेले नाहीत.
म्हणून बापाचा आदर करा, कारण त्याने पाहिलेले स्वप्न तुमच्या भरोशावर आहेत. त्याच्यासाठी मुलांचे स्मित हास्य हे दिवसभरासाठीची टॉनिक आहे. व्यसन आणि वाईट वळणावर जाऊ नका ही त्याची अंतीम चिंता त्याला सतावत असते. जिवंत असे पर्यंत तो फक्त तुमचाच विचार करत असतो. काळजी करू नकोस मी अजून जिवंत आहे. हे वाक्य सार काही सांगून जातात.
+ There are no comments
Add yours